गुरुवार २६ नोव्हेंबर २००९

ऐक धरित्रे..!!

ऐक धरित्रे, तुझ्या उरातील
गर्भांकुर ते नवे नव्हाळे
उमलून येता अंगांगावरी
बाहू तुझे गं लेकुरवाळे

ग्रीष्माचा गं अफ़ाट वणवा
थोडेसे तू सोस उन्हाळे
तुझ्याच साठी घेऊन येईन
मेघ अनोखे निळे सावळे

सचैल घालेन स्नान तुजला
बहरून येशिल राजस बाळे !
लेऊन घेशील साज आगळा
माणिक, पाचू, मोती, पोवळे

तृप्त होऊनी, गीत तुझे मग
कडेकपारीतूनी झुळझुळे
इंद्रधनूच्या झुल्यावरी गं
घेशिल हलके तू हिंदोळे

आज लेऊनी घे गं तूही
सुर्याचे हे लखलख वाळे
उद्या पुन्हा मी बरसत येईन
पुरवेन आणिक तुझे डोहाळे

- प्राजु

सोमवार २३ नोव्हेंबर २००९

थोडे..थोडे..

प्रीतकळ्यांनी आणि फ़ुलांनी, मला दिधले दान थोडे
दिसले तुझिया डोळ्यांमध्ये, प्रेमफ़ुलांचे रान थोडे

ओठावरचे टिपून घ्यावे, ओठांनी मधुगान थोडे
देहबोली वेड लावते, तरी राखावे भान थोडे

मिटून डोळे भासांना तव देते मी आव्हान थोडे
रोज रात्रीला बांधावे मी स्वप्नांशी संधान थोडे

तव सरींनी शिंपून घ्यावे माझ्या मनीचे आंगण थोडे
आणि भाळी रेखून घ्यावे तव प्रीतीचे गोंदण थोडे

मेहेंदीमध्ये रंगून जावे विसरूनिया मी भान थोडे
गूज सांगते आज तुजला आंतरमन, तू जाण थोडे

आवर माझ्या देही भिनले तव सयींचे सामान थोडे
तुझ्या प्रीतीसौख्याने व्हावे, आज मी धनवान थोडे

- प्राजु

शनिवार २१ नोव्हेंबर २००९

घालमेल..

रात्र आता पुन्हा नव्याने स्वप्न तुझे मग दाखवेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..

सावळा प्रकाश भरून राहिल,दाही दिशांत वाहून जाईल
कोवळी झुळुक वार्‍याचीही तरूवेलींना हसवून जाईल
ओंजळीतून निशेच्या मग चांदण-चुरा नभात पसरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..

खिडकीमध्ये हळूच आता,मंद सुगंध डोकावतो
हृदयामध्ये उसळणार्‍या लाटांसही धुंदावतो
उगाच रातराणी माझ्या मनीमानसी बहरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..

सुरू होईल पुन्हा पुन्हा मग,विविध छटांची स्वप्नमालिका
श्याम तू, नि तुझी मी राधा,तुझ्या ओठीची कधी सानिका
डोळ्यांवरती स्वप्न दुलई, रात्र आता पांघरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..

- प्राजु